Pune

एकास मारहाण, दोघांना जीवे मारण्याची धमकी; एकाला अटक

By PCB Author

January 28, 2022

मावळ, दि. २८ (पीसीबी) – दोघांनी मिळून एकास मारहाण केली. त्यानंतर जखमी मुलाच्या वडिलांना आणि चुलत्याला पिस्तुल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 27) दुपारी मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे घडली.

गणेश कैलास उफाडे (वय 20) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शंकर कोंडीबा कोयते (वय 58, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पुतण्या मिथुन तबाजी कोयते याला आरोपी अल्पवयीन मुलाने लाकडी दांडक्याने मारहाण करून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर पाडले. आरोपी गणेश याने हातात तलवार घेऊन शिवीगाळ, दमदाटी केली. गुरुवारी दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा भाऊ तबाजी कोंडीबा कोयते दुचाकीवरून पुतण्या मिथुन यांच्याकडे जात होते. त्यावेळी ठाकर चौकात आरोपींनी टमटम गाडीतून पिस्तूल सारखी वस्तू आणली. फिर्यादी आणि त्यांच्या भावाला मारून टाकतो. आताच पोरांना घेऊन येऊन तुमच्या कुटुंबीयांकडे बघून घेतो, अशी धमकी देत आरोपी कारमधून निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक पंडित अहिरे तपास करीत आहेत.