Maharashtra

एकही आश्वासन पूर्ण न केल्याने भाजपची नोंदणी रद्द करा – शिवसेना  

By PCB Author

October 01, 2018

मुंबई, दि. १ (पीसीबी) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता पाच वर्षांत न केल्यास राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. याचा आधार घेत शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे. भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी १०१ आश्वासने जनतेला दिली होती. मात्र, यातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे सर्वात आधी निवडणूक आयोगाने भाजपची नोंदणीच रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात पक्षांकडून देण्यात आलेल्या जाहीरनाम्याची प्रत आयोगाकडे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सत्तेवर आल्यानंतर दिलेली आश्वासने पूर्ण केली किंवा कसे?, याबाबत जनतेला माहिती देणे बंधनकारक केले आहे. तसेच आश्वासनांची पूर्तता पाच वर्षात न केल्यास राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली जाईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी पुण्यात नुकतीच केली होती.

या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.  ‘जर राज्य निवडणूक आयोगाने आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला असेल, तर याची सुरुवात त्यांनी भाजपापासून करायला हवी. भाजपने निवडणुकीत १०१ आश्वासने दिली होती. मात्र, सत्तेत आल्यावर त्यांनी यातील एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.