Maharashtra

एकनाथ शिंदे आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार ?

By PCB Author

June 28, 2022

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं असून हे सरकार अल्पमतात आल्याचाही दावा केला जात आहे. मात्र आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी अजूनही चर्चा करण्यास तयार आहोत, असं बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती करण्याबाबत निर्णय घ्यावा, असं केसरकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे समजते. ‘उद्धव ठाकरे यांनी त्यांचा जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपसोबत चर्चा केली पाहिजे. ते कुठे दुखावले गेले असतील तर त्याची कारणे जाणून घेतली पाहिजेत आणि भाजपनेही त्याचा विचार केला पाहिजे. भाजप आणि शिवसेना हे अनेक वर्षांचे मित्र आहेत. त्यांनी एकत्र कसं यावं, हे सांगण्याएवढा मी मोठा नाही. भाजप आणि शिवसेनेनं चर्चा करावी. या चर्चेतून काही सकारात्मक निघालं आणि उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना बोलावलं तर तेही उद्धव ठाकरे यांना भेटायला जातील. मुख्यमंत्र्यांना दुखवावं असं शिंदे यांच्या मनात नाही. फक्त शिवसेनेनं कोणाशी आघाडी आणि युती करावी, एवढ्यापुरता हा प्रश्न मर्यादित आहे,’ अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढत असल्याची घोषणा केल्यानंतर ते आता सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे हे मुंबईत दाखल होतील आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे भाजपच्या समर्थनाचं पत्र देतील, असं बोललं जात आहे. यााबबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, ‘विधीतज्ज्ञांशी चर्चा करून एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. माझं अद्याप त्यांच्याशी याबाबत बोलणं झालेलं नाही. मात्र असे निर्णय घेतले गेले तर त्यावर थेट कृती केली जाते.’ दरम्यान, उद्धव ठाकरे यांना आम्ही कालच एक पत्र पाठवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेल्या आदरातून आम्ही हे पत्र लिहिलं आहे. आता या प्रेमाचा स्वीकार करायचा की ते नाकारायचं, याचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे, असंही केसरकर म्हणाले.