एकनाथ खडसे यांना या प्रकरणासाठी ईडी ची नोटीस

0
174

मुंई, दि. २६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस पाठवली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ईडीला एकनाथ खडसेंविरोधात कोणते पुरावे मिळाले आहेत याविषयी तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यासंबंधी माहिती देताना अद्याप आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी आपल्याला नोटीस येणार असल्याची माहिती मिळाली असल्याचंही सांगितलं आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार आहे.

“मला अनेक सुत्रांकडून नोटीस येणार असल्याचं कळालं आहे. जिथपर्यंत मला कळालं आहे ही नोटीस पुण्यातील भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी आहे,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.

“ख्रिसमसची सुट्टी असल्याने कदाचित नोटीस अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही. कोणत्याही तपास यंत्रणेने नोटीस पाठवली तरी मी चौकशीला सामोरं जाण्यास पूर्णपणे तयार आहे. मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याचं कारणच नाही,” असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

“माझ्याविरोधात सुरु असलेल्या चौकशांमुळे आश्चर्य वाटत आहे. मला नेहमी वाटायचं की ईडी १०० कोटी किंवा त्याहून अधिकच्या प्रकरणांमध्ये लक्ष घालतं. जर हे पुणे जमीन प्रकरणाबद्दल असेल तर त्यात चार कोटींहून कमी व्यवहार आहे. ज्या जमिनीबद्दल चर्चा आहे ती माझी पत्नी आणि जावयाने विकत घेतली होती. या व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आहे,” असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं आहे.

“या व्यवहाराची चौकशी करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने मला आधीच क्लीन चीट दिली आहे. माझ्याकडे सर्व कागदपत्रं आहेत. निवृत्त न्यायाधीशांच्या आयोगाने केलेल्या चौकशीतही काही समोर आलं नव्हतं,” असंही खडसेंनी सांगितलं.

“मला अशा प्रकारच्या चौकशांची सवय आहे. मी स्वत: या जमिनीचा मुद्दा विधानसभा आणि सार्वजनिक ठिकाणी २०१६ पासून अनेकदा उपस्थित केला आहे. मी माझी बाजू मांडली आहे. आरोप करणाऱ्यांना या व्यवहारात नेमका गुन्हा काय आहे हेदेखील मी विचारलं आहे. पण अद्यापपर्यंत उत्तर आलेलं नाही,” अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे.