Maharashtra

एकनाथ खडसेंवरील अन्याय संपेल, त्यांना न्याय मिळेल – चंद्रकांत पाटील

By PCB Author

September 02, 2018

जळगाव, दि. २ (पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे राज्यात भाजपचे सरकार येण्यामागे मोठे योगदान आहे. भाजपची सत्ता येण्यासाठी खडसे यांनी मोठे श्रम घेतले आहे. अन्याय कुणावरही कायम नसतो. त्यातून न्याय मिळतो. एकनाथ खडसेंवरील अन्याय संपेल आणि त्यांना न्याय मिळेल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.   

मुक्ताईनगर तालुक्यातील कोठळीमध्ये आज (रविवार) एकनाथ खडसे यांच्या अभिष्टचिंतनाचा सोहळा आयोजित केला होता. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

चंद्रकांतदादांच्या विधानावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, आपल्याला आता कुठलीच अपेक्षा नाही, असे सांगून त्यांनी दिवार चित्रपटातील अमिताभ आणि शशी कपूर यांच्यातील संवादाचे उदाहरण दिले. आपल्यामागे जनता असल्याचे सांगून त्यांनी भाजपला टोला लगावला.

आपण क्लीन चिट आहोत, असे सरकार म्हणायला तयार नाही. त्यामुळे वाढदिवशी आपण एक संकल्प करतोय, आपण दोषी आहोत की नाही हे जनतेला पटवून देण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करणार आहोत. जनतेने सांगितले की तुम्ही दोषी आहात, तर राजकारण सोडून देईन, असा इशाराही खडसेंनी यावेळी दिला.