Maharashtra

एकनाथ खडसेंनी अंजली दमानियांवर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याचे न्यायालयाचे आदेश

By PCB Author

August 29, 2018

औरंगाबाद, दि. २९ (पीसीबी) – माजी मंत्री व भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. त्यामुळे दमानिया यांना दिलासा मिळाला आहे.

खडसे यांनी दाखल केलेले गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खंडपीठाने यापूर्वीच्या प्रकरणात खडसे यांना प्रतिवादी करण्याचे आदेश देत राज्य शासन व मुक्ताईनगर (जि. जळगाव) पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते.

याचिकेच्या सुनावणीवेळी दमानिया यांच्यावर दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी मंगळवारी दिले. खंडपीठात युक्तिवाद करताना दमानिया यांच्याविरुद्ध सर्व ऐकीव माहितीच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे दमानिया यांच्या वकिलांनी सांगितले. कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही. केवळ सूड घेण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल केल्याचे युक्तिवादारम्यान सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने हा गुन्हा मागे घेण्याचे आदेश दिले.