एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात पुन्हा संधी नाही; भाजप सोपविणार मोठी जबाबदारी  

2210

जळगाव, दि. १७ (पीसीबी) – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या घडामोडींना वेग आला आहे.  विजयादशमीच्या दिवशी विस्ताराला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. मात्र, या विस्तारात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे पुन्हा संधी द्यायची की भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा द्यायची. याबाबत पक्षात खलबते सुरू असल्याचे  खात्रीशीर वृत्त सूत्रांकडून मिळत आहे.

खडसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्याबाबत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्यापही संभ्रमावस्थेत आहेत.  त्यामुळे  त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाचीच धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. या दृष्टीने पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून काही सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  संघटनेच्या  पातळीवर हा बदल करण्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे, असे  समजते.

दरम्यान, जळगावमध्ये भाजपच्या मेळाव्यात खडसे यांनी मंत्रिमंडळात  पुनरागमन करण्यास इच्छुक नसल्याचे जाहीरपणे स्पष्ट केले होते.  मात्र, त्यांनी  पुन्हा मंत्रिपदाची जबाबदारी घेण्यास नकार दर्शवला असला तरी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री जळगावात असताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व खडसे सोबत होते. त्यामुळे खडसेंच्या मनात नेमके काय चालले आहे, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.