Maharashtra

एकनाथ खडसेंना ‘ईडी’ची नोटीस. संजय राऊत भडकले, म्हणाले…

By PCB Author

December 26, 2020

मुंबई, दि.२६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस पाठवली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसे यांनीदेखील इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आपल्याला नोटीस येणार असल्याची माहिती मिळाल्याचं सांगितलं आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

“आमच्या शिवसेनेच्या लोकांनाही नोटीस आल्या आहेत. जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही अशा लोकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही. यासाठीच विरोधी पक्षाने एकत्र यावं आणि मजबूत संघटन उभं करावं अशी आमची भूमिका आहे,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

संजय राऊत यांनी यावेळी सामना संपादकीयवरही भाष्य केलं. सामना संपादकीयमधून युपीएला चिमटे काढण्यात आले असून युपीएकडे मोदींसारखे नेतृत्व आणि अमित शाह यांच्यासारखे राजकीय व्यवस्थापक नाहीत अशी टीका केली आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “युपीएची ताकद वाढणं गरजेचं आहे. युपीएमध्ये जास्तीत जास्त पक्ष आणि नेत्यांनी एकत्र येऊन जी हुकूमशाही सुरु आहे त्याच्याविरोधात उभं राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांचा आणि विरोधी पक्षांचा आवाज उठवला पाहिजे. विरोधी पक्ष कमजोर होणं म्हणजे देशातील लोकशाही संपण्यासारखं आहे”.

शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावं का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “या देशात सोनिया गांधींच्या बरोबरीने शरद पवार एक असं नेतृत्व आहे ज्यांना देशात मान्यता आहे. त्यामुळे त्यांचाही विचार होऊ शकतो”.