Maharashtra

एकदिवसीय संपात देशभरातील तीन लाख डॉक्टर्स सहभागी

By PCB Author

July 28, 2018

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – केंद्र सरकारच्या ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ विधेयकाच्या विरोधात देशभरातील खासगी डॉक्टरांनी आज (शनिवार) एक दिवसचा संप पुकारला आहे.  आज सायंकाळी ६ वाजता हा संप मागे घेण्यात येणार आहे. या देशव्यापी संपात तीन लाख डॉक्टर्स सहभागी झाले आहेत. या संपामुळे वैद्यकीय सेवा कोलमडली असून रूग्णांचे हाल होत आहेत.   

महाराष्ट्रातील ४२ हजार डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील लुट रोखण्यासाठी केंद्र सरकारने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया बरखास्त करून नॅशनल मेडिकल कमिशन आणण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे विधेयक सोमवारी (दि. ३०) संसदेत सादर करण्यात येणार आहे . त्यामुळे  डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियामध्ये ८० टक्के सदस्य निवडून येतात. तर इतर २० टक्के सदस्यांची नियुक्ती केली जाते. मात्र, नव्या विधेयकानुसार कमिशनवर केवळ ५ जण निवडून जाणार आहेत. तर इतर  जागा केंद्र सरकार भरणार आहेत. त्यामुळे हे कमिशन संपूर्णत: केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली जाणार असल्याने राज्य सरकारचा अधिकार संपुष्टात येणार आहे. त्यामुळेच या डॉक्टरांनी या विधेयकाला कडाडून विरोध दर्शवला  आहे.