‘एआयसीटीई’ स्थापणार हरियाणामध्ये ‘आयडिया लॅब’ प्रशिक्षण केंद्र

0
371

– ‘डीवायपीआययु’च्या आयडिया लॅब कार्यक्रमात डॉ. कुमार यांनी केले जाहीर

पुणे, दि. २३ (पीसीबी) : देशातील शिक्षणसंस्थांमध्ये प्रयोगशीलतेला व नवनिर्मितीला चालना मिळावी आणि त्याद्वारे विविध सामाजिक समस्यांवर उपाययोजना करता यावी, यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘आयडिया लॅब’ या उपक्रमाला आता कुशल प्रशिक्षणाची जोड देण्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (‘एआयसीटीई’) ठरवले आहे. त्याचाच भाग म्हणून लवकरच हरियाणा येथे देशातील पहिलेवाहिले ‘आयडिया लॅब’ प्रशिक्षण केंद्र स्थापण्यात येणार आहे. ‘एआयसीटीई’चे सदस्य-सचिव डॉ. राजीव कुमार यांनी ही माहिती गुरुवारी दिली.डी.वाय.पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे (डीवायपीआययु) आयोजित ‘एआयसीटीई आयडिया लॅब’ या सहा दिवसीय प्राध्यापक विकास कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी डॉ. कुमार बोलत होते. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) सहकार्याने होणाऱ्या या कार्यक्रमाचा उदघाटनसोहळा ‘डीवायपीआययु’च्या आकुर्डी येथील कॅम्पसमधील शांताई सभागृहात झाला. या वेळी एआयसीटीई ‘आयडीसी’चे सल्लागार डॉ. नीरज सक्सेना, ‘डीवायपीआययु’चे कुलगुरू प्रा. प्रभात रंजन, डॉ. अमरीश दुबे आदी उपस्थित होते. देशभरातील प्राध्यापक-संशोधक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.या वेळी सक्सेना यांनीही आयडिया लॅब संकल्पनेच्या निर्मिती मागील उद्दिष्ट विशद केले. ते म्हणाले, ‘येता काळ हा प्रामुख्याने ऑनलाइन शिक्षणाचा असणार आहे. या बदलत्या शिक्षणपद्धतींशी अधिक सक्षमपणे विद्यार्थ्यांना जुळवून घेता यावे, यासाठी ‘एआयसीटीई’ नेहमीच प्रयत्नरत असणार आहे.’ आयडिया लॅब हा केवळ एक उपक्रम न राहता अतिशय कमी काळात त्याने एका चळवळीचे स्वरूप घेतले आहे. देशात प्रत्येक महाविद्यालयात एक आयडिया लॅब असावी, असेही त्यांनी नमूद केले. प्रा. रंजन यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.