एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अनुराग लांबोरच्या संशोधन प्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवर मान्यता

0
727

ए आय एस एस एम एस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अनुराग लांबोर च्या संशोधन प्रकल्पाला राष्ट्रीय पातळीवर मान्यता 

कोरोना विषाणू च्या निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त

पिंपरी, दि. ०७ (पीसीबी) – एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या अनुराग लांबोर आणि त्याच्या टीम ने ‘द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन सेल आयोजित नाशनाल इनोव्हेशन कोन्तेस्त २०२०’ या स्पर्धेत मोठे यश प्राप्त केले आहे. या स्पर्धेकरिता संपूर्ण देशातून ९००० हून अधिक प्रोजेक्टसचे सादरीकरण झाले. या टीम च्या ‘युव्ही सी ब्लास्टर या प्रोजेक्ट ला अंतिम १२७ प्रोजेक्ट मध्ये स्थान मिळाले. हे उपकरण आपण दररोज हाताळणाऱ्या नोटा, मोबाईल, फळभाज्या, खाद्यपदार्थ, मास्क इत्यादी सारख्या वस्तू निर्जंतुक करण्याचे कार्य करते. सहज व सोप्या पद्धतीने वापरता येणारे हे उपकरण अल्ट्राव्हायलेट व तापमान विषयक परिणामांचा वापर करून विषाणूंचा नायनाट करण्यासाठी सध्याच्या घातक कोविड-१९ च्या परिस्थितीमध्ये खूप प्रभावी ठरते. या प्रकल्पाविषयी बोलताना अनुराग लांबोर याने सांगितले “ यात अल्ट्रा व्हायोलेट प्रकाशाचा प्रभावी वापर करून संपूर्ण (360⁰ )निर्जंतुकीकरण करता येते. हे उपकरण वापरासाठी सहज सोपे आणि सुरक्षित बनवले आहे.याच्या वापराने ९९.९९% विषाणू चा नाश होतो.” या उपकरणाच्या उपयुक्ततेबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला “सध्याच्या कोविड-१९ च्या परिस्थितीमध्ये निर्जंतुकीकरणाची खूप गरज आहे ती गरज या उपकरणाने पूर्ण होते.घरातील फळभाज्या आणि पालेभाज्या यांच्या आयुष्यमान वाढीसाठी प्रभावी तसेच बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही उपकरणापेक्षा हे स्वस्त, सुरक्षित आणि वापरास सुलभ आहे.”

या स्पर्धेमध्ये अंतिम निवड झालेल्या विजेत्यांना भारत सरकार कडून तंत्रज्ञान, मार्गदर्शन, इंक्युबेशन आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते. प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या डॉ विद्या पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. कॉलेजचे प्राचार्य डॉ.डी.एस. बोरमणे, इलेक्ट्रिकल विभागाच्या प्रमुख डॉ. गोडबोले यांनी टीमला त्यांच्या संपूर्ण संशोधन प्रकल्पात सर्व प्रकारची मदत आणि प्रोत्साहन दिले. संस्थेचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती, सहसचिव सुरेश शिंदे आणि कोषाध्यक्ष अजय पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.