Pune Gramin

उसन्या पैशांच्या वादावरून अभिनेते प्रणव जोशी यांना जीवे मारण्याची धमकी

By PCB Author

October 04, 2020

तळेगाव दाभाडे, दि. ४ (पीसीबी) – उसने घेतलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाने अभिनेते प्रणव जोशी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडला आहे.

प्रणव रघुनाथ जोशी (वय 32, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव बाळकृष्ण चिखले (रा. खेड) याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेते प्रवण जोशी यांनी आरोपी गौरव चिखले याला काही पैसे उसने दिले होते. त्यातील काही रक्कम चिखले याने जोशी यांना दिली होती. तर काही रक्कम शिल्लक होती. 25 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जोशी यांनी चिखले याला राहिलेले उसने पैसे देण्याची मागणी केली. त्यावरून चिखले याने जोशी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत 3 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.