उषा मंगेशकर यांना लता मंगेशकर पुरस्कार

0
259

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकरपुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्काराची घोषणा अमित देशमुख यांनी केली आहे. पुरस्काराचे स्वरुप पाच लाख रुपये, मानधन, स्मृतीचिन्ह असं असणार आहे. हा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल उषा मंगेशकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.
उषा मंगेशकर यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत. सुबह का तारा, जय संतोषी मां, आझाद, चित्रलेखा, खट्टा मीठा, काला पत्थर, नसीब, खुबसूरत, डिस्को डान्सर, इन्कार अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी उषाताईंचे पुरस्काराबददल अभिनंदन केले आहे. हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार शासनाने आपल्याला प्रदान करण्याचे घोषित केल्याबद्दल उषाताई मंगेशकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. गायन व संगीत या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केलेल्या कलाकारास राज्य शासनातर्फे सन १९९२ पासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात येते. संगीतकार राम – लक्ष्मण, उषा खन्ना, उत्तम सिंग, प्रभाकर जोग, गायिका सुमन कल्याणपूर, आशा भोसले, पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले यांसारख्या अनेक मान्यवरांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.