उर्मिला मातोंडकरांचा काँग्रेस सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा

0
433

मुंबई, दि. १० (पीसीबी) – पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून  उर्मिला मातोंडकर यांनी  आपल्या काँग्रेसच्या सदस्यात्वाचा राजीनामा आज (मंगळवार) तडकाफडकी दिला.  लोकसभा निवडणुकीच्या आधी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.   

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.  त्यांनी भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते.  परंतु निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा  मोठ्या फरकाने  पराभव केला होता.

पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून  राजीनामा दिला असल्याचे मातोंडकर यांनी म्हटले आहे.  तसेच १६ मे रोजी  मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा  यांना  पाठवलेल्या पत्रावर कोणतीही कार्यवाही  करण्यात आलेली नाही, याबाबतही त्यांनी  नाराजी व्यक्त केली होती.

या पत्रातील गोपनीय माहिती नंतर सोयीस्करपणे माध्यमांना पुरवण्यात आली. मी याचा वारंवार निषेध करूनही पक्षातील कोणीही माफी मागण्याचीही तसदी घेतली नाही. या पत्रात ज्यांची नावे होती त्या उत्तर मुंबईतील काही जणांना त्यांच्या निवडणुकीतील वाईट कामगिरीबाबत जाब विचारण्याऐवजी नवी चांगली पदे देण्यात आली, असे त्यांनी म्हटले आहे.