“उर्दू माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची भरती करा”: फारुक इनामदार

0
348

– पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या अंतर्गत असलेल्या सहा उर्दू शाळांमध्ये शिक्षकांची भरती तात्काळ करावी, अशी मागणी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष फारूक इनामदार यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, स्वयंअर्थसहायित योजनेंतर्गत महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांपासून रुपीनगर, थेरगाव, खराळवाडी, लांडेवाडी, नेहरुनगर व दापोडी या सहा ठिकाणी उर्दू माध्यमाचे नववीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतर २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांपासून नैसर्गिकवाढीच्या तत्त्वानुसार दहावीचे वर्ग भरत आहेत. त्यासाठी दरवर्षी मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करावी लागते. त्यांची सहा महिन्यांची मुदत संपल्यावर या शिक्षकांची जागा रिक्त होते. या शाळांमध्ये प्रत्येक ठिकाणी तीन याप्रमाणे १८ शिक्षकांची आवश्यकता आहे. पण, शाळेच्या पहिल्या दिवशी एकही शिक्षक उपलब्ध नव्हते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मन:स्ताप सहन करावा लागला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत असताना माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन करणे अपेक्षीत होते. मात्र, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

याबाबत माहिती घेतली असता, संबंधित शाळा सुरू करण्यासाठी येणाऱ्या भौतिक व शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी येणाऱ्या खर्चास व वर्ग सुरू करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. तसेच, शिक्षण विभागाकडे पिंपरी-चिंचवड एज्युकेशन सोसायटीने उर्दू शिक्षकांची मागणी सहा महिन्यांपूर्वी केली होती. त्याची दखल अद्याप घेतलेली नाही. विद्यार्थी आणि पालकांच्या हिताच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने कार्यवाही करुन शिक्षक भरती प्रक्रिया करावी, अशी मागणीही फारूक इनामदार यांनी केली आहे.