विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज वाया गेल्याच्या निषेधार्थ एकदिवशीय उपोषणात सहभागी झालेल्या पुण्यातील दोन आमदारांनी प्रशासकीय बैठकीत नाश्ता करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. उपोषणाआधी कुठेही नाश्ता करू नका किंवा छायाचित्र, सेल्फी काढू नका अशा सूचना भाजपने दिल्या होत्या. मात्र, त्या सुचनांना केराची टोपली दाखवण्यात आली. भाजप आमदारांना प्रशासकीय बैठकीत सँडविच, बर्फी, वेफर्सवर ताव मारला.  

त्यामुळे एकदिवसीय उपोषणाआधी छोले-भटुरेवर ताव मारणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर टीका करणाऱ्या भाजपाला त्यांच्याच आमदारांनी अडचणीत आणले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आमदार बाळा भेगडे आणि भीमराव तापकीर हे नाश्ता करताना स्पष्टपणे दिसून येत आहेत.

देशभरात भाजपाचे सर्व खासदार आणि पदाधिकारी आज लाक्षणिक उपोषणास बसले आहेत. पुण्यात देखील खासदार अनिल शिरोळेंसह शहर व ग्रामीण भागातील भाजपाचे पदाधिकारी लाक्षणिक उपोषणास बसले आहेत. त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकाजवळील विधानभवन येथे पालकमंत्री गिरीश बापट आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम, जलयुक्त शिवार योजनेच्या बैठकीवेळी सँडविच, वेफर्स आणि बर्फीची प्लेट सर्वाना  दिली. त्यावेळी बाळा भेगडे आणि भीमराव तापकीर यांनी प्लेटमधील पदार्थावर ताव मारला.