उपमहापौर तुषार हिंगे यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला

0
637

पिंपरी, दि.१४(पीसीबी) – भाजपच्या वरिष्ठांना आदेश दिल्यानुसार पिंपरी चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांचा आज राजीनामा घेण्यात आला. दरम्यान, अधिक नगरसेवकांनी संधी मिळावी म्हणून सव्वा वर्षे पदाची अट ठेवली होती आणि त्यानुसार हा राजीनामा असल्याच स्पष्टीकरण देण्यात येत आहे. असे असेल तर महापौर माई ढोरे यांचा राजीनामा का नाही घेतला, इतक्या तडकाफडकी एकट्या उपमहापौरांचाच राजीनाम का घेतला यावर चर्चा रंगली आहे.

२०१७ च्या महापालिका सार्वत्रीक निवडणुकित हिंगे हे मोरवाडी प्रभागातून भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झाले. त्यांना क्रीडा समिती सभापती पद मिळाले होते. उपमहापौर पदासाठी यावेळी शितल शिंदे यांचे नाव निश्चित केले होते, पण त्यांनी नकार दिल्याने आयत्यावेळी हिंगे यांना या पदासाठी अर्ज भरायला सांगितले आणि ते उपमहापौर झाले.

उपमहापौर तुषार हिंगे यांच्याकडे विचारण केली असता ते म्हणाले, मला आज सकाळी पक्षनेत्यांनी बोलावले होते आणि वरिष्ठांचा निरोप दिला. पक्षाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनीही मला राजीनामा देण्याची सुचना केली त्या नुसार लगेचच महापौर माई ढोरे यांच्याकडे तो सुपूर्द केला आहे. पुढच्या सात महिन्यांसाठी आणखी दोन उपमहापौर करायचे आहेत, असे महेशदादांनी मला सांगितले. माझे काम समाधानकार नाही का, माझ्याबद्दल काही तक्रार आहे का, माझे कुठे चुकले असेही मी स्वतः आमदार महेशदादा यांना विचारले. तसे काहीच नाही असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात कशामुळे राजीनामा घेतला त्याचे समाधानकारक इउत्तर मलाही मिळालेल नाही. मी स्वतः शॉक झालो.

मला उपमहापौर मिळाले त्याला अवघे १० महिने झाले. या काळात मी लोकांशी अधिकाधिक संपर्क वाढवला. पक्षाचा कार्यक्रम घरोघरी नेला, भरपूर काम केले. कदाचीत माझ्या चांगल्या कामाची हीच पावती असावी असा टोला हिंगे यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला.

दरम्यान, उपमहापौर हिंगे यांच्या कार्यपध्दतीबद्दल अनेक तक्रारी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेल्या होत्या. त्यानंतर पाटील यांनी आमदार महेश लांडगे यांना राजीनामा घेण्यास सांगितले. आमदार लांडगे यांनी आज तत्काळ त्याची अंमलबजावणी केली असे सांगण्यात आले.