Pimpri

उपचारानंतर पिंपरी – चिंचवडमधील तिघांचा अहवाल निगेटिव्ह

By PCB Author

March 26, 2020

 

पिंपरी, दि.२६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यांदा तीन करोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात गेल्या १४ दिवसांपासून उपचार सुरू आहेत. उपचारानंतर या तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आज पुन्हा पुण्यातील एनआयव्हीमध्ये घशातील द्रव्याचे नमूने पाठवले जातील. अहवाल हा निगेटिव्ह आल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य यांच्यासह दाम्पत्याची मुलगी, दाम्पत्याला मुंबईहून घेऊन येणारा कॅब चालक आणि दुबई ट्रिपमधीलसह एक प्रवासी यांचा यात समावेश आहे. यातील दाम्पत्याचे दुसरे निगेटिव्ह रिपोर्ट मंगळवारी रात्री उशिरा तर उरलेल्या तिघांचे निगेटिव्ह रिपोर्ट बुधवारी संध्याकाळी आले आहेत.

दरम्यान, एकीकडे जगभर कोरोनाची दहशत असताना दुसरीकडे पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात चोवीस तासांत ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच ४८ तासांत शहराच्या हद्दीत एकाही कोरोनाग्रस्त रुग्णाची भर पडली नाही, असेही माहिती मोहोळ यांनी दिली.