Maharashtra

उध्दव ठाकरेंनी मोदीवर केलेली टीका ही राजकीय भाषणबाजी – रावसाहेब दानवे

By PCB Author

November 25, 2018

लातूर, दि. २५ (पीसीबी) – अयोध्येत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राममंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, त्यांना त्याचा राजकीय फायदा होणार नाही. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदीवर केलेली टीका ही राजकीय भाषणबाजी आहे, असा निशाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे यांनी ठाकरे यांच्यावर साधला.   

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दानवे  आज (रविवार) लातूरमध्ये आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शनिवारी उद्धव ठाकरे अयोध्येत गेले आहेत. त्यावेळी त्यांनी  झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी येथे आलो आहे, अशी टीका मोदींवर केली होती. यावर बोलताना दानवे म्हणाले की, राम मंदिर हा मुद्दा नवीन नसून या मुद्यावर शिवसेना-भाजपसोबत होती. हा निवडणुकीचा मुद्दाच होवू शकत नाही. ठाकरे हे अयोध्येत गेले त्यांचे स्वागत आहे. पण त्यांना याचा राजकीय फायदा होणार नाही, असे ते म्हणाले.

भाजप हा विकासाच्या अजेंड्यावर आगामी लोकसभा निवडणूक लढणार आहे.  लोकसभा व विधानसभा निवडणूक समविचार पक्षानी एकत्र येवून लढवावी, ही भाजपची इच्छा आहे. मत विभाजनाचा काँग्रेस व राष्ट्रवादीला फायदा होवू नये, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे शिवसेनेशी युतीचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.