Maharashtra

उध्दव ठाकरेंची बैठक, चौथ्या लॉकडाऊनची रणनीती कशी असेल…

By PCB Author

May 14, 2020

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली महाविकास आघाडीची बैठक संपली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर कसा आणता येईल याबाबतची चर्चा या बैठकीत झाला. या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांसह मुख्य सचिव अजॉय मेहता आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह उपस्थित होते. या बैठकीत झोननुसार कुठल्या गोष्टी सुरु करता येतील यावर चर्चा झाली. अर्थव्यवस्थेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीच्या अहवालावर मंथन झालं. पंतप्रधान नरेंद मोदीयांनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याबाबतचे नियम 18 मेपूर्वी जाहीर करु, असं त्यांनी सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवरही महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. देशातील तिसऱ्या लॉकडाऊनची मुदत 17 मे रोजी संपणार आहे. मात्र त्यापुढील म्हणजे चौथ्या लॉकडाऊनची रणनीती कशी असेल, कुठे शिथीलता द्यायची, उद्योगधंदे कसे सुरु करायचे, कुठे सुरु करायचे अशी सर्वव्यापी चर्चा या बैठकीत झाली. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत ही बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.