उद्रेक…, जुलै मध्ये ११ लाख कोरोनाग्रस्त

0
214

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – जगात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. शुक्रवारीही देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत एका दिवसातील सर्वात मोठी वाढ झाली. शुक्रवारी देशात ५७ हजार करोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. दरम्यान, केवळ जुलै महिन्यात भारतात ११.१ लाख कोरोनाबाधित आढळले असून १९ हजार १२२ जणांना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत २.८ टक्क्यांनी वाढ झाली. जून महिन्याच्या अखेरिस देशात कोरोनाबाधितांची संख्या ४ लाखांच्या वर होती. तर दुसरीकडे जून महिन्याच्या तुलनेत मृतांची संख्यादेखील १.६ टक्क्यांनी वाढली आहे. जून महिन्याच्या अखेरिस कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्याही ११ हजार ९८८ इतकी होती. जुलै महिन्यात कोरोनानं इतका वेग पकडला की अखेरच्या १५ दिवसांमध्ये तब्बल ७.३ लाख रुग्णांची नोंद करण्यात आली. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट आहे.

चौथ्या दिवशी ५० हजार

शुक्रवारी भारतात ५७ हजार १५१ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. सलग चौथ्या दिवशी देशात कोरोनाबाधितांच्या संख्येनं ५० हजारांचा टप्पा ओलांडला. शुक्रवारी कोरोनामुळे तब्बल ७६६ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे कोरोनामुळे सलग चौथ्या दिवशी ७५० पेक्षा अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. शुक्रवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात ३६ हजार ५५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर शुक्रवारच्या आकडेवारीनुसार देशात १० लाख ९५ हजार ६४७ जणांनी कोरोनावर मात केली आणि सध्या देशात ५ लाख ६४ हजार ५८२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. देशातील कोरोना रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी चिंता निर्माण करणारी आहे.

संपूर्ण देशभर करोना रुग्णांची संख्या चिंताजनक वेगाने वाढत असून गेल्या चोवीस तासांत ५५ हजार ७८ लोकांना संसर्ग झाला, तर ७७९ रुग्ण दगावले. तर महाराष्ट्रात १०,३२० रुग्णांची नोंद झाली.

देशातील एकूण रुग्णसंख्या १६ लाख ३८ हजार ८७० वर पोहोचली असून आतापर्यंत करोना संसर्गाने ३५ हजार ७४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ३७ हजार २२३ रुग्ण करोनामुक्त झाले असून ५ लाख ४५ हजार ३१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उच्चस्तरीय मंत्रिगटाच्या १९व्या बैठकीत दिली. केंद्र सरकारने पुणे, ठाणे, बेंगळूरु, हैदराबाद अशा करोनाग्रस्त शहरांवर लक्ष केंद्रित केले आहे.

शुक्रवारी राज्यात १०,३२०

महाराष्ट्रात लागोपाठ दुसऱ्या दिवशी  १०,३२० नवे रुग्ण आढळले. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या सव्वाचार लाखांच्या आसपास पोहोचली आहे. राज्यात करोना बळींची संख्या १५ हजारांच्या घरात पोहोचली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे या शहरी भागातच कोरोना रुग्णांचा अक्षरशः उद्रेक झालेला पहायला मिळतो.

मुंबईत ११०० जणांना संसर्ग

मुंबईत शुक्रवारी ११०० रुग्णांची नोंद झाली असून ५३ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत सध्या २०,५६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत ५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा ६३५० वर गेला आहे. मुंबईतील करोना रुग्णवाढीचा सरासरी दर एक टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. मात्र मुंबईतील बोरिवली आणि नानाचौक-मलबार हिल या भागात हा दर सर्वात कमी आहे. ठाणे जिल्ह्य़ातील नव्या रुग्णसंख्येत नवी मुंबईतील ३९८, ठाण्यातील ३५५, कल्याण-डोंबिवली शहरातील ३२९, ठाणे ग्रामीणमधील १९०, मीरा-भाईंदरमधील १२७, अंबरनाथमधील ६२, उल्हासनगर शहरातील ५४, बदलापूरमधील ५१ आणि भिवंडीमधील २७ रुग्णांचा समावेश आहे.

ठाणे जिल्ह्य़ात १,५९३ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारी १,५९३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण रुग्णांची संख्या ८५,९५६ वर पोहोचली आहे. दिवभरात ४३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्य़ातील मृतांचा आकडा २,३६५ झाला आहे.