उद्योजक नानासाहेब गायकवाड व ‘तात्याचा ढाबा’ हॉटेलचा मालक सचिन वाळके विरोधात अपहरण, मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल.

0
2184

पुणे, दि.६ (पीसीबी) –  व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी संमोहनतज्ञ महेश काटे यांचे अपहरण करून मारहाण करुन पिस्तुलाचा धाक दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी औंध येथील उद्योजक नाना गायकवाड व तात्याचा ढाबा हॉटेलचे मालक सचिन वाळके यांच्यासह दोन जणांवर चतु:र्श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महेश पोपट काटे (वय ३७, रा. पाली, सुधागड, मुळ गाव पिंपळे सौदागर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी नानासाहेब शंकर गायकवाड (रा. औंध), सचिन वाळके (रा. बाणेर), अंकुश राजुदादा उर्फ राजाभाऊ, विकास बालवडकर, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश काटे संमोहनतज्ञ असून त्यांचे उपचार केंद्र आहे. त्यांनी व्यवसायासाठी पैशाची गरज असल्याने २०१७ मध्ये त्यांचे मावसभाऊ सचिन वाळके यांच्या ओळखीने उद्योजक नाना गायकवाड यांच्याकडून २०१७ मध्ये तीस लाख रुपये उसने घेतले होते. त्यावेळी त्यांनी सेक्युरिटी म्हणून त्यांच्याकडून चार कोरे चेक घेतले होते. यातील दहा लाख रुपये त्यांनी त्याचवर्षी परत केले. व उरलेले वीस लाख रुपयापोटी ते दर महिना ऐंशी हजार रुपये देत होते. अशाप्रकारे त्यांनी सोळा लाख ऐंशी हजार रुपये रोख स्वरूपात परत दिले होते. व बाकीची रक्कम काही अडचणींमुळे थोड्यावेळाने परत करणार असल्याचे सांगितले. जून २०१९ मध्ये त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने त्यांना पैसे देणे शक्य झाले नाही. पैसे देण्यासाठी ते थोडा वेळ मागत असताना नानासाहेब गायकवाड त्यांना जिवे मारण्याची धमकी देत होते. राहिलेल्या रकमेपोटी नानासाहेब गायकवाड यांनी काटे यांची रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील आतोणे गावच्या जमिनीचे खरेदीखत आपल्या पत्नीच्या नावे नोंदवून घेतले. तरिही त्यांची पैशाची मागणी सुरुच राहिली.

दरम्यान सचिन वाळके यांनी महेश काटे यांना शुक्रवारी ३ जानेवारी रोजी दीड वाजण्याच्या सुमारास बाणेर येथील तात्याचा ढाबा हॉटेल येथील बोलवून घेतले तात्याचा ढाबा या हॉटेलवर सचिन वाळके व विकास बालवडकर यांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करत स्विफ्ट गाडी बसवून घेऊन गेले. सुसगाव येथील एनएसजी या नानासाहेब गायकवाड यांच्या आलिशान फार्म हाऊसवर महेश काटे यांना डांबवून ठेवण्यात आले. नाना गायकवाड व त्याच्या साथीदाराने काटे यांना मारहाण केली. मारहाणी दरम्यान पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत महेश काटे यांची प्रॉपर्टी घर व जमीन लिहून दे असे नाना गायकवाड यांनी असे धमकावले व मारहाण केली. या मारहाणीमध्ये महेश काटे बेशुद्ध पडले. यानंतर काटे यांचे मावसभाऊ संदीप वाळके यांनी मध्यस्थी करत काटे यांना घरी आणले. व्याजाने दिलेले पैसे मिळवण्यासाठी केलेली मारहाण, अपहरण तसेच बंदुकीचा धाक दाखवल्या प्रकरणी तसेच दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी नाना शंकर गायकवाड (रा. औंध) सचिन वाळके (रा. बाणेर), अंकुश राजुदादा उर्फ राजाभाऊ, विकास बालवडकर यांच्याविरुद्ध चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.