Pimpri

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योजकांच्या समस्यांबाबत शनिवारी मोशीत उद्योजक मेळावा

By PCB Author

November 18, 2022

पिंपरी,दि.१८(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना येणाऱ्या विविध समस्या, त्यावर चर्चा करण्याकरिता येत्या शनिवारी (दि.19) उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत मेळाव्याला उपस्थितीत राहणार असून उद्योजकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

मोशीतील संतनगर चौक येथील पर्ल बेन्क्वीट येथे शनिवारी दुपारी चार वाजता हा मेळावा होणार आहे. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, बाळासाहेबांची शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अजय भोसले हे उपस्थित राहणार आहेत.

महापालिका कार्यक्षेत्रातील आणि चाकण औद्योगिक परिसरात  उद्योजकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात भुयारी गटार योजना, सी.इ.टी.पी.प्लांट, खंडित वीज पुरवठा, वीज दरवाढ, MSEDCL ची सहा नवीन सबस्टेशन उभारणी, औद्योगिक परिसरातील कचरा समस्या, औद्योगिक परीसरातील अग्निशमन केंद्राचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित आहे. वाहतूक व्यवस्था ( बस सुविधा ), वाढत्या अनाधिकृत झोपडपट्टी व वाढती अनाधिकृत भंगार दुकाने, तळवडे-चाकण, भोसरी-चाकण, चिखली, देहू-आळंदी रोड या परिसरात साधारण सकाळी व संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. तळवडे, चिखली, भोसरीचा काही भाग हा रेडझोन बाधित आहे. या ठिकाणी अनेक उद्योजकांनी छोटे भूखंड घेऊन उद्योग चालू केलेले आहेत. परंतु, या परिसरात शासन किंवा महापालिका कोणत्याही प्रकारची सुविधा देण्यास तयार होत नाही. बँक कर्जसुविधा देत नाही.

शास्ती कर रद्द करणेबाबत, महाराष्ट्रात नवीन औद्योगिक गुंतवणूक वाढविणेबाबत, महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या अपुऱ्या सुविधेबाबत,लघुउद्योजकांना भूखंड उपलब्ध होणे बाबत, एक खिडकी योजना, सबसिडी बाबत, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, औद्योगिक परिसरात होणाऱ्या चोऱ्या बाबत, ट्रक टर्मिनल जागेबाबत, वृक्ष लागवड व संवर्धनासाठी भूखंडाबाबत, संघटना  ऑफिस  भूखंडाबाबत,पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेला औद्योगिक परिसरात ऑफिस व कामगार प्रशिक्षणाकरिता १००० चौरस मीटरचा भूखंड विना मोबदला उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. याबाबतची माहिती पिंपरी-चिंचवड लघुउद्योजग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड यांनी दिली.