उद्योगनगरीतही रात्रभर पावसाचे थैमान

0
199

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात रात्री मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप आलं होतं. शहरात काही ठिकाणी झाड पडल्याच्या, घरात पाणी शिरलं असल्याच्या तसंच मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचल्याच्या २९ घटना घडल्या आहेत. या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांसह अग्निशमन दलाच्या जवानांची देखील धावपळ झाली. भोसरी येथील आपटे कॉलनीमधील मैदानात फूटभर पाणी साठल्याने तळ्याचे स्वरुप आले होते.

पिंपरी-चिंचवडसह परिसरात दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत होता. मात्र रात्री नऊच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाचा जोर वाढला आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्री बारा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतर काही प्रमाणात पाऊस ओसरला होता. मात्र, मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, शहरात सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. शिवाय, अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने अख्खी रात्र जागून काढण्याची वेळ आली.

सांगवी, चिखली, निगडी प्राधिकरण, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, मोरवाडी, थेरगाव अशा अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटनांसह झाड पडल्याची घटना घडली.