Maharashtra

उद्या सायंकाळपर्यंत भाजपाचा खेळ संपेल- नवाब मलिक

By PCB Author

November 26, 2019

मुंबई, दि.२६ (पीसीबी)- महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी पूर्ण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या मतदानाचे लाइव्ह टेलिकास्ट करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय भारतीय लोकशाहीतील मैलाचा दगड ठरला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

“सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल हा भारतीय लोकशाहीतील मैलाचा दगड ठरला आहे. उद्या सायंकाळी पाच वाजेच्या अगोदर भाजपाचा खेळ संपला असल्याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर काही दिवसातच राज्यात शिवसेना -राष्ट्रवादी -काँग्रेसचे सरकार येईल.” असे आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

“लोकशाही मूल्यांचं रक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या (२७ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश आम्ही देत आहोत,” असं न्यायाधिशांनी स्पष्ट केलं.

बहुमतासाठी घेण्यात येणारे मतदान हे गुप्त पद्धतीने न घेता ते थेट घेण्यात यावे तसेच या मतदानाचे लाइव्ह टेलिकास्ट करण्यात यावे असंही न्यायलयाने स्पष्ट केलं आहे. संबंधित निकाल देताना न्यायलयाने बहुमत चाचणीसाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून आमदारांना शपथ देण्याचे आदेश दिले आहेत.