Maharashtra

उद्या पक्षाने म्हटले घरी बस, तर मी घरी बसेन – मुख्यमंत्री

By PCB Author

October 19, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी) –  मला माझा पक्ष सांगेन तेव्हा मी दिल्लीत जाईन, उद्या पक्षाने म्हटले घरी बस तर मी घरी बसेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मला जितके राजकारण समजते, त्यानूसार राज्याला माझी गरज आहे. पक्षाला वाटले की मी महाराष्ट्रात राहावे, त्यामुळे मी महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातच राहीन, असे मुख्यमंत्री  यांनी सांगितले.

राज्य बँकेत घोटाळा तर झालाच आहे.  आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये शरद पवारांसह सर्वांची नावे आहेत.  यामध्ये त्यांची भूमिका काय होती आणि कोणती कलमे लावली आहेत, याचाही उल्लेख करण्यात आला आहे, त्यामुळे ईडीच्या चौकशीत शरद पवारांचे नाव आले आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

घोटाळ्याचा ऑडिट रिपोर्ट बघितला तर अनेक ठिकाणी सुस्थितीतील साखर कारखाने काही कारणांनी तोट्यात आणले आणि विकायला काढले, काही लोकांनी ते कवडीमोल दराने विकत घेतले आणि आघाडी सरकारचा वापर करुन बँकांची देणी रद्द करवून घेतली. हा घोटाळाच असून याचे कनेक्शन राष्ट्रवादीच्या नेत्यांशी आहे, असा आरोप ही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.