उद्धव ठाकरे यांच्या “या वक्तव्यावर हसावे की रडावे हेच कळत नाही – सचिन सावंत

0
508

मुंबई, दि.१९ (पीसीबी) – “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता,” असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले होते. या वक्तव्यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर हसावे की रडावे हेच कळत नाही,” असा टोला सावंत यांनी लगावला आहे.

‘सावरकर: इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. “आमचं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव केला पाहिजे. आम्ही महात्मा गांधी आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेले कार्य नाकारत नाही. देशासाठी काही काळ नेहरूंनी तुरूंगवास भोगल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. मी त्यांना सागू इच्छीतो की सावरकर यांनी १४ वर्षांचा तुरूंगवास भोगला आहे आणि त्यांनी मरणयातनादेखील भोगल्या आहेत. जर नेहरूंनी अशा यातना भोगल्या असत्या आणि ते १४ मिनिटांसाठी जरी तुरूंगात गेले असते तरी त्यांना नायक म्हणण्यास आमची हरकत नव्हती. त्यावेळी सावरकर जर देशाचे पंतप्रधान असते, तर पाकिस्तानच जन्मालाच आला नसता,” असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

 

उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. “या वक्तव्यावर हसावे की रडावे हेच कळत नाही. १९३७ साली द्विराष्ट्राची संकल्पना स्वत: सावरकरांनी मांडली होती,” असे सांगत सावंत यांनी ठाकरे यांची  खिल्ली उडवली आहे.