उद्धव ठाकरेंवर कारवाई करा; भाजप जिल्हाध्यक्षांची मागणी

0
518

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – महायुतीच्या जागावाटपात  कणकवली विधानसभा मतदारसंघाची जागा  भाजपच्या वाट्याला गेली  आहे. तरीही शिवसेनेने या जागेवर आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे  शिवसेनेच्या उमेदवाराला एबी फॉर्म देणाऱ्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर महायुतीने कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली  आहे. तरीही युतीत काही जागांवर झालेल्या बंडखोरीमुळे तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मित्रपक्षाने बंडखोरी केलेल्या जागांवरून एकमेकांवर टीकाटिप्पणी  या दोन्ही पक्षांकडून सुरू झाली आहे.

कणकवलीत भाजपने नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  कणकवलीत सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. तर सेना-भाजप उमेदवार आमने-सामने आहेत,  तिथे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे जाणार नाहीत, असे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी म्हटले  आहे.