‘उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही’

0
204

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे’, अशा भावना मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केल्या. राऊतांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी त्यांना टोमणा मारलाय. ‘उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही, असं राऊतांना वाटतं’, असं म्हणत फडणवीसांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला.

संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी राष्ट्रीय नेता व्हावं, असं म्हटलं. असं वाटत असेल ते चांगलंच आहे. उद्धव ठाकरेंनी नक्की मोठं व्हावं, असं फडणवीस म्हणाले. तर राऊतांना टोमणा मारताना उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षाही मोठं नाही, असं राऊतांना वाटतं, असं फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, माननीय मुख्यमंत्र्यांना मी फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना जी संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करत त्यांनी जनतेची जास्तीत जास्त सेवा करावी, अशा शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. तो दिवस लवकरच उगवेल, असं ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या ट्विटमुळे उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अखंड साथ. अतूट नाते. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे. तो दिवस लवकरच उगवेल. आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राऊतांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केलं. महाराष्ट्रातील नेता देशाचं नेतृत्व करत असेल तर आम्हाला आनंदच आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.