“उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसारखा दौरा करु नये”; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

0
175

मुंबई,दि.२०(पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात परतीच्या पावसाने बसलेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी सोलापुरचा दौरा करत आहेत. त्यांनी दरम्यान आपल्या विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून ते पूर्ण होऊन संपूर्ण माहिती येताच प्रत्यक्ष मदत दिली जाईल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर बोलताना त्यांनी फडणवीसांरखा दौरा करुन उपयोग नाही, असं म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे कि, “मुख्यमंत्र्यांनी सोलापूरमधील काही गावांचा दौरा केला. असा धावता प्रवास करुन काही होणार नाही. खूप ठिकाणी जाऊन लोकांना भेटलं पाहिजे. मुख्यमंत्री व्हायचं असतं कारण, जे वाटतं ते तिथल्या तिथे निर्णय जाहीर करुन प्रशासनाकडून त्यांची अंमलबजावणी करता आली पाहिजे. काल नाही, पण किमान आज काहीतरी मदत जाहीर करायला हवी होती जेणेकरुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. बाकीच्यांनी प्रवासच करायचा असतो. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी प्रवास करायचा, अश्रू पुसायचे, तुमच्या मागण्या मांडतो असं सांगायचं.”

“मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासारखा प्रवास करुन काही उपयोग नाही. त्या प्रवासात काही ठोस घोषणा केल्या पाहिजेत. पुन्हा अतिवृष्टी होईल, पाहतो असं बोलायचं नसतं,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. प्रवास सुरु केला हा चेष्ठा करण्याचा विषय नाही, पण त्यांनी ठोस निर्णयही घ्यावेत असंही ते म्हणाले.

पुढे चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांना टोला लगावत न विसरता असही म्हणाले कि, “शरद पवारांबद्दल माझ्या मनात नेहमी आदर आहे. राज्यात मुख्यमंत्री असताना, केंद्रात असताना कितीतरी गोष्टींना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. पण त्यांना वारंवार मुख्यमंत्र्यांची भलावण करावी लागते याचं वाईट वाटतं. उद्धव ठाकरेंना घरी थांबा असं पवारसाहेब मनपासून बोलले नसतील. या वयात मी बाहेर पडलो तुम्हीही बाहे पडत असं म्हणत असतील.”