उद्धव ठाकरेंना आरक्षणातल काय कळत; नारायण राणेंची बोचरी टिका

0
829

मुंबई, दि. २ (पीसीबी) – उद्धव ठाकरेंना आरक्षणातील काय कळते, घटनेतील कोणत्या कलमांतर्गत आणि कसे आरक्षण देता येईल हे त्यांनी सांगावे, अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. मराठा आरक्षणा संदर्भात भाष्य करताना ते बोलत होते.

रत्नागिरीतील स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी (दि. १) चिपळूण येथील माटे सभागृहात पार पडला. यात खासदार नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. मराठा आरक्षणासंदर्भात नारायण राणे म्हणाले, मी मंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. राज्यात ३४ टक्के मराठा समाज असून यातील २० टक्के समाज दारिद्र्यात आहे. अशा लोकांसाठी मी अभ्यास करुन अहवाल सादर केला. या आधारे आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले. पण राज्यात सत्तेवर येताच शिवसेनेने हे आरक्षण काढून घेतले. शिवसेनेमध्ये आज अनेक मराठा आमदार, खासदार आहेत. पण ते फक्त पदाला चिकटले आणि जात विसरले.

आज शिवसेना सत्तेत आहे. मात्र, त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही. मी फोन केला की तत्काळ भेट मिळते, असे त्यांनी नमूद केले. उद्धव ठाकरेंना आरक्षणातील काही कळतं का, घटनेतील कोणत्या कलमाअंतर्गत आरक्षण मिळते हे त्यांनी सांगावे, असेही राणे म्हणालेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आम्हीच केला असून रत्नागिरीत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. पण जिल्ह्यात बेरोजगारी वाढली. आता जनतेनेच शिवसेनेला का निवडून द्यावे, याचा विचार करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.