Maharashtra

उदयनराजे केव्हाही कॉलर उडवू शकतात; मुख्यमंत्र्यांचे उध्दव ठाकरेंना उत्तर

By PCB Author

September 16, 2019

कराड , दि. १६ (पीसीबी) – उदयनराजे भोसले  हे मुक्त विद्यापीठ आहेत. त्यांना हवे तेव्हा ते कॉलर उडवू शकतात, ती त्यांची स्टाईल आहे, अशा शब्दांत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी उदयनराजेंबाबत केलेल्या विधानाला  उत्तर दिले आहे.

उदयनराजे यांनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला आणि भाजपत प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही.शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, त्यांचे अभिनंदन!, अशा शब्दांत नुकताच  भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्या उदयनराजे यांचा  उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या संपादकीयमधून समाचार घेतला आहे.  यावर  मुख्यमंत्र्यांनी चोख उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  उदयनराजे यांचा बेशिस्तपणा खपवून घेतला. पण भाजपमध्ये असे होणार नाही,  असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.  यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जेव्हा शिस्त पाळण्याची आवश्यकता असते, तेव्हा उदयनराजे शिस्तबद्ध ही असतात, असे म्हटले आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिट्या मारणे, कॉलर उडवणे किंवा इतर नाट्यछटा करणे, असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत,  असे सामनाच्या अग्रलेखात  म्हटले आहे. परंतु  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या कृतीचे एकप्रकारे समर्थन केले आहे.