उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत – संजय राऊत

0
593

मुंबई, दि.१५ (पीसीबी) – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते उदयनराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर देताना उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत असा टोला लगावला आहे. “उदयनराजे काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भाजपाचे माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. त्यांनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावं लागत नाही,” असे संजय राऊत यांनी सांगितले. “आम्ही सातारा, कोल्हापूरमधील गादीचा आदर करतो. महाराजांचे नाव जिथे येतं तिथे आम्ही नतमस्तक होतो. शिवाजी महाराजांच्या नावाने बाळासाहेबांनी एकजुटीचं काम पुढे नेले,” असेही यावेळी ते म्हणाले.

संजय राऊत यांनी यावेळी शरद पवार जाणते राजे असल्याचे सांगत उदयनराजेंच्या टीकेचा समाचार घेतला. “शरद पवार जाणते राजे आहेतच. त्यांना जनतेने ही उपाधी दिली आहे. शिवसेना प्रमुख स्वत: म्हणाले नाहीत की आपण हिंदूह्रदयसम्राट आहोत. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, लोकांनी त्यांना राजा मानले. महाराष्ट्रात देशासाठी, समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणारा माणूस जनतेचा राजा आहे. आम्हीही शरद पवारांना तो मान देतो,” असे उत्तर यावेळी त्यांनी दिले.