Maharashtra

उदयनराजेंचा २ लाख मतांनी पराभव होईल – पृथ्वीराज चव्हाण

By PCB Author

October 15, 2019

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार  श्रीनिवास पाटील उदयनराजेंविरोधात तब्बल २ लाख मतांच्या फरकाने निवडून येतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात चव्हाण बोलत होते.

उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन  भाजपमध्ये  प्रवेश केला आहे. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने साताऱ्यात उदयनराजेंविरोधात श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादीच्या तिकीटावर उदयनराजे सातारा लोकसभेची जागा जिंकले. परंतु चार महिन्यात खासदारकीचा राजीनामा देऊन ते भाजपत गेले. त्यानंर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सातारा लोकसभेची जागा लढवण्याचे मला सुचवले होते. काँग्रेस पक्षश्रेष्ठींचंही तसे मत होते, परंतु मी शरद पवारांना म्हणालो की, साताऱ्याची पोटनिवडणूक तुम्हीच लढा.