उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रिया दत्तऐवजी काँग्रेसकडून नगमाला उमेदवारी?

0
592

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – माजी खासदार प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून  अभिनेत्री नगमा यांचे नाव  काँग्रेसकडून आघाडीवर आहे.  त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि ज्येष्ठ चित्रपट अभिनेते राज बब्बर यांचीही नांवे चर्चेत  आहेत.

तर या मतदार संघात विद्यमान खासदार आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या खासदार पूनम महाजन यांची  दुसऱ्यांदा उमेदवारी निश्चित मानली जात आहे.  प्रिया दत्त यावेळी निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याचे समजते. गेल्या दोन वर्षांपासून त्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रीय नाहीत. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या त्या सहसचिव  असूनही   सक्रीय राजकारणापासून दूर राहिल्या आहेत.

दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरूपम यांची नियुक्ती झाल्यापासून प्रिया दत्त या पक्षापासून दूर राहिल्या असल्याचे सांगितले जात आहे.  गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांना हजेरी लावलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.