Desh

उत्तर भारतीयांना मारहाण करणारे रामाची सेवा काय करणार? भाजप आमदाराचा शिवसेनेला खोचक सवाल

By PCB Author

November 26, 2018

अयोध्या, दि. २६ (पीसीबी) – शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नुकताच अयोध्येचा दौरा केला. यावेळी त्यांनी राम मंदिर उभारण्याबाबत मोदी सरकारला अल्टीमेटम् दिला. दरम्यान ठाकरे यांच्या या दौऱ्यावर आता उत्तर भारतातील नेत्यांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. उत्तर भारतीयांना मारहाण करणारे रामाची सेवा काय करणार?, असा सवाल उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी केला आहे.

सिंह अयोध्येत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलून घेतल्याबद्दल  आक्षेप घेतला. शिवसेनेला साधी माणूसकी सुद्धा नाही, ते श्रीरामाची सेवा कशी  काय करणार?, असा सवाल शिवसेनेला केला आहे. मुंबईत उत्तर भारतीयांना शिवसेनेकडून मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिंह यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उध्दव ठाकरेंचे कौतुक केले आहे. भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी देखील राम मंदिर उभारण्याबाबत उध्दव ठाकरे यांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे. मात्र, उत्तरेतील भाजप नेत्यांनी उध्दव यांच्यावर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली आहे.  तर अयोध्येमधील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना याबाबत प्रश्न केला होता. यावेळी मुंबई उत्तर भारतीयांसाठी सुरक्षित असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता.