Desh

उत्तर प्रदेश मध्ये मदरशांत मुस्लिम पेहरावावर बंदी; मुले आणि मौलवी शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसणार

By PCB Author

July 04, 2018

लखनऊ, दि. ४ (पीसीबी) – उत्तर प्रदेशच्या मदरशांमध्ये एनसीइआरटी ची पुस्तके बंधनकारक केल्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार ड्रेस कोड लागू करण्याच्या तयारीत आहे. यासाठी एक विशेष प्रस्ताव आणला जाणार आहे. योगी सरकारचा नवीन प्रस्ताव लागू झाल्यास यापुढे या राज्यातील मदरशांमध्ये मुस्लिम पेहराव दिसणार नाही. लहान-लहान मुले आणि मौलवी सुद्धा कुडता पायजामा नाही तर शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसून येतील.

उत्तर प्रदेशात अल्पसंख्याक प्रकरणांचे राज्यमंत्री मोहसिन रझा यांनी सांगितल्याप्रमाणे, येथील मदरशांमध्ये मुले प्रामुख्याने कुडता आणि पायजामा घालून येत असल्याचे दिसून येतात. प्रत्यक्षात ही एका विशिष्ट धर्माची ओळख आहे. अशा कपड्यांमुळे त्या मुलांच्या मनात हीन भावना येते. त्यामुळे, ही गोष्ट बंद करणे आवश्यक आहे. मदरशातील मुले सुद्धा समाजातील मुख्य प्रवाहाशी जोडले जावे अशी सरकारची इच्छा आहे. ते एखाद्या सामान्य शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे दिसावेत असे आम्हाला वाटते.

मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, मदरशांतील मुलांना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी त्यांच्या अभ्यासक्रमात बदल बंधनकारक करण्यात आला आहे. एनसीईआरटीची पुस्तके त्यांना अनिवार्य आहे. गणित, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी म्हणाले होते, की मदरशांतील मुलांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात लॅपटॉप हवा तेव्हाच ते विकास करू शकतील. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने मुस्लिमांच्या नावे फक्त मतपेट्यांचे राजकारण केले असे आरोप रझा यांनी लावले आहेत.