“उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करायला लाकडं शिल्लक राहिलेली नाहीत’

0
649

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांवर अंत्यसंस्कार करायला लाकडं शिल्लक राहिलेली नाहीत. त्यामुळे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडले जात आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केले.

ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी गंगा नदीत मृतदेहांचा खच पडल्याच्या सोशल मीडियावरील व्हीडिओसंदर्भात भाष्य केले. माझं मूळ गाव उत्तर भारतात आहे. तेथील लोकांचे आम्हाला फोन येत आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कोणत्याही व्यक्तीची कोरोना चाचणी होत नाही. त्याठिकाणी उपचार करण्यासाठी डॉक्टर नाहीत. एवढंच काय मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडंही शिल्लक राहिलेली नाहीत. अशी परिस्थिती असताना योगी सरकार टीव्हीवर जाहिराती करत आहे. उत्तर प्रदेशात रामराज्य आलं आणि सरकारने लोकांना रामभरोसे सोडून दिलं, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे आकडे लपवले जात नाहीत. कोणालाही उपचारापासून वंचित राहावे लागेल, अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. भाजपशासित राज्यात मात्र चित्र वेगळे आहे, असेही नवाब मलिक यांनी म्हटले.

हृदयद्रावक! बक्सरच्या गंगा घाटावर मृतदेहांचा खच, प्रशासन म्हणे, “आमचे नव्हे, तर यूपीचे मृतदेह”

महाराष्ट्राचा ऑक्सिजन अडवण्याचा प्रयत्न
महाराष्ट्राला बिल्लारीमधून येणारा ऑक्सिजन बंद करण्यात आला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील ऑक्सिजन गोव्याला देणे योग्य नाही. हे सर्व महाराष्ट्रात जाणीवपूर्वक अडचण निर्माण करण्यासाठी सुरु आहे. योगी सरकार म्हणते आम्ही फक्त स्थानिक लोकांनाच लस देणार. केंद्र सरकार याबाबत काय विचार करत आहे? देशात एकच पद्धत असली पाहिजे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

बक्सरच्या गंगा घाटावर मृतदेहांचा खच
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माणुसकीला लाजिरवाणी घटना बिहारच्या बक्सर (Baxur) जिल्ह्यात घडली असून, यातून कोरोनाचं विदारक चित्र समोर आलंय. चौसा येथील महादेव घाटावर मृतदेहांचा खच पडलाय. उत्तर प्रदेशातील मृतदेह येथे आणले जात आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिलीय. कोरोना काळात बक्सर जिल्ह्यातील चौसाजवळील महादेव घाटावरची छायाचित्रानं सगळेच हादरलेत. या मृतदेहांनी गंगेचा महादेव घाटच भरलाय. मात्र, या घटनेचा व्हिडीओ समोर येताच जिल्हा प्रशासनाचे हात वर केलेत.