उत्तर प्रदेशात २५ लाखावर स्थलांतरीत

0
299

लखनौ, दि.२ (पीसीबी) : लॉकडाऊनच्या काळात अनेक स्थलांतरित मजुरांनी आपापल्या गावची वाट धरली आहे. उत्तर प्रदेशात घरवापसी करणाऱ्या मजुरांचा आकडा येत्या काही दिवसात तब्बल २५ लाखांवर पोहोचेल, असा अंदाज उत्तर प्रदेशच्या गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी वर्तवला.

परप्रांतीय मजुरांची वाहतूक करणार्‍या १५८७ रेल्वेगाड्या सोमवार दुपारी दोन वाजेपर्यंत उत्तर प्रदेशात आल्या. तर आणखी १६ गाड्या दिवसभरात दाखल होत आहेत. येत्या ३ दिवसात आणखी ६० ट्रेन दाखल होतील. यासह, रेल्वेने यूपीला येणार्‍या मजुरांची संख्या अंदाजे २५ लाखांपर्यंत पोहोचेल, असा उत्तर प्रदेशच्या गृह खात्याचा कयास आहे.

आम्ही ‘आशा’ सेविकांच्या मदतीने राज्यात परत आलेल्या परप्रांतीय कामगारांचा मागोवा घेत आहोत. आतापर्यंत ११ लाख ४७ हजार ८७२ मजुरांचा ठावठिकाणा समजला आहे. त्यापैकी १०२७ जणांमध्ये कोरोनाची लक्षण दिसत आहेत. त्यांचे नमुने कोव्हीड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत, असं उत्तर प्रदेशच्या आरोग्य खात्याचे प्रधान सचिव अमित मोहन प्रसाद म्हणाले.

उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत ३७३७ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. राज्यात सध्या कोरोनाचे ३०८३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ४८९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २१७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातील मजुरांना काम द्यायचं असल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल, असा पवित्रा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याआधी घेतला होता. त्यावर, महाराष्ट्राची परवानगी घेतल्याशिवाय उत्तर प्रदेशातील कामगारांना आत येता येणार नाही, हे यूपीचे आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता.

महाराष्ट्रातून परतणाऱ्या मजुरांवरुन वादंग
दरम्यान, महाराष्ट्रातून आणि विशेषत: मुंबईतून परतणाऱ्या मजुरांवरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आकडेवरीवरुन प्रश्न विचारले होते. प्रियांका म्हणाल्या होत्या, “मुख्यंत्र्यांच्या वक्तव्यानुसार महाराष्ट्रातून परतलेले ७५ टक्के दिल्लीतून आलेले ५० टक्के आणि अन्य प्रदेशातून आलेले २५ टक्के मजूर कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यूपीमध्ये २५ लाख मजूर आलेत, मग इथे १० लाख कोरोना बाधित आहेत का?”

बिहारमध्ये १३ तब्बल लाख क्वारंटाईन
उत्तर प्रदेश प्रमाणे बिहार राज्यातही स्थलांतरीत मजुरांची संख्या मोठी आहे. मुंबई, नवी दिल्ली, गुजराथ, कर्नाटकातून आलेल्या या मजुरांपैकी तब्बल १३ लाख जणांना क्वारंटाईन केले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार सरकारने कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी विविध उपाय योजना केल्या आहेत. देशातील कोरोनाचा गुणाकार यापुढेच सुरू होणार असून पाचव्या टप्प्यात कोरोनाचे भयंकर रुप पहायला मिळेल असा तज्ञांचा अंदाज आहे. सरकारलाही आपल्या मर्यादा लक्षात आल्याने आता यापुढे बिहारमध्ये येणाऱ्यांना थेट घरी पाठविण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.