Notifications

उत्तर कोरियाचे व्यापारी जहाज अमेरिकेकडून ताब्यात; आंतरराष्ट्रीय तणावामध्ये भर

By PCB Author

May 11, 2019

उत्तर कोरिया, दि. ११ (पीसीबी) – आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन करणारे उत्तर कोरियाचे व्यापारी जहाज अमेरिकेने ताब्यात घेतले आहे. दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण असताना ही पहिलीच ठोस कारवाई करण्यात आली आहे. उत्तर कोरियाचे दुसऱ्या क्रमांकाचे जहाज ‘दी वाइज ऑनेस्ट’ अमेरिकेने एप्रिल २०१८ मध्ये इंडोनेशियात थांबले असताना ताब्यात घेतले आहे. ते आता अमेरिकन समोआ येथे नेले जाणार आहे. अमेरिकेच्या न्याय खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. उत्तर कोरियाने दोन लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागल्यानंतर अमेरिकेने या कारवाईची घोषणा केली आहे. पाच दिवसात उत्तर कोरियाने दोनदा क्षेपणास्त्र चाचणी केली असून अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यात अण्वस्त्र निर्मूलनाबाबतच्या वाटाघाटी फिसकटत असताना त्यात या कारवाईची आणखी भर पडली आहे.