Videsh

उत्तराखंडावर पुन्हा एकदा निसर्गाची वक्रदृष्टी; हिमस्खलनामुळे घडली गंभीर घटना…

By PCB Author

April 24, 2021

चमोली,दि.२४( पीसीबी) – उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्याच्या नीती खोऱ्याच्या सुमनाच्या पुढे मोठ्या प्रमाणावर झालेल्या वर्फवृष्टीमुळे या भागात हिमस्खलन घडल्यानं अनेक रस्त्याचं काम करणारे अनेक मजूर इथं अडकून पडले होते. भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) चा एक कॅम्प अचानक धडकलेल्या बर्फाच्या वादळात सापडला. भारतीय लष्कराच्या हाती अद्याप दोन मृतदेह लागले असून तब्बल २९१ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय.

शुक्रवारी २३ एप्रिल रोजी दुपारी ४.०० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. उत्तराखंडमधील सुमना – रिमखिम रस्त्यावर सुमनापासून सुमारे ४ किमी पुढे एका हिमस्खलन होऊन बर्फाच्या वादळानं या भागाला धडक दिली. भारत – चीन सीमेपासून अगदी काही किलोमीटर अंतरावर जोशीमठ – मलेरी- गिरिथोब्ला – सुमना- रिमखीम रस्त्यावर हा भाग आहे.

रस्ते बांधकाम करणारी ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ची (BRO) एक तुकडी आणि दोन कामगार शिबिरं या मार्गावर स्थित होती. तर सुमनापासून जवळपास ३ किलोमीटर अंतरावर ‘आर्मी कॅम्प’ आहे. गेल्या पाच दिवसांपासून या भागात मुसळधार पावसासह बर्फवृष्टीही सुरू होती. अजूनही ही बर्फवृष्टी सुरूच आहे.