उत्तम नट तर गेलाच, पण जवळचा मित्र गमावला – अशोक सराफ

0
1323

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांच्या जाण्याने वैयक्तिक नुकसान आणि एक जवळचा मित्र गमावल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

“विजय चव्हाण यांच्या जाण्याने खरोखरच एक पोकळी निर्माण झाली आहे. एक हरहुन्नरी नट, कुठल्याही भूमिकेत चपखल बसणारा असा विजय होता. ‘मोरुची मावशी’ या नाटकातील मावशीची भूमिका अजरामर आहे. एक नट तर गेलेला आहेच पण एक जवळचा मित्र गेला याचे दु:ख अधिक आहे.

आम्ही बऱ्याच चित्रपटात काम केली. प्रत्येकवेळी त्याने स्वत:ची छाप सोडली. चांगला मित्र गेला याचे जास्त दु:ख आहे. विजयने शून्यातून करिअर सुरु केले. काही जणांना निसर्गदत्त असते, काहींना स्वत:ला कर्तृत्त्वाने निर्माण करावे लागते. मावशीच्या रोलने त्याने फार काही मिळवले. त्याने स्वत:च्या कर्तृत्त्वाने मिळवले. विजयची शैली वेगळी होती. त्याने स्वत:ची स्टाईल निर्माण केली होती. त्यामुळे ती इंडस्ट्रीच्या दृष्टीने महत्त्वाची होती”, अशी भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केली.