Chinchwad

  ‘उठ पार्था तुझ्याशिवाय आता पर्याय नाही’; धनंजय मुंडेंचे मावळमधून पार्थ पवारांच्या उमेदवारीचे संकेत   

By PCB Author

February 03, 2019

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) –  ‘उठ पार्था तुझ्या शिवाय आता पर्याय नाही’,  असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी  अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मावळमधील लोकसभेच्या उमेदवारीवर सुचक विधान केले.  

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत मुंडे बोलत होते. यावेळी  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,  छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार अण्णा बनसोडे,  भाऊसाहेब भोईर, नाना काटे, प्रशांत शितोळे, वर्षा जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की,  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवडसह मावळ लोकसभेसाठी खूप वर्ष झिजले आहेत. आता त्यांना मावळ लोकसभेत आशीर्वाद द्या,  असे आवाहन  मुंडे यांनी केले. तसेच  महाभारतात “श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणजेच पार्थाला म्हणाले होते. ‘उठ पार्था तुझ्या शिवाय आता पर्याय नाही’, हा संदर्भ देत पार्थ पवारच्या मावळमधून  लोकसभेच्या उमेदवारीचे संकेत दिले.

दरम्यान, मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. हाच धागा पकडून मुंडे यांनी  त्याबाबतचे  संकेत दिले आहेत.