Maharashtra

“उठसूठ केंद्राकडे बोट दाखवणं बंद करा, मग तुम्ही राज्य सरकार कशाला चालवता?”

By PCB Author

January 03, 2021

मुंबई, दि.०३ (पीसीबी) : विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. औरंगाबादच्या नामांतरणावर त्यांनी महाविकाआघाडीला “औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणे बंद केलं पाहिजे.” असं म्हणत खडेबोल सुनावले आहेत.

कुठल्याही शहराचं नामकरण करण्यासाठी महापालिकेचा प्रस्ताव, राज्य सरकारची मंजुरी आणि मग केंद्राची मान्यता अशी प्रक्रिया आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करायच असेल, तर महापालिका तुमची आहे तिथे ठराव करा, राज्याच्या कॅबिनेटला निर्णय द्या. असं देखील दरेकर यांनी सांगितलं आहे.

पुढे प्रवीण दरेकर असंही म्हणाले कि,“यांचा(राज्य सरकारचा) एकही विषय, एकही दिवस, एकही सेकंद केंद्राशिवाय जात नाही. कुठलीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट दाखवयचं, मग तुम्ही कशाला राज्य सरकार चालवता? महाकाली लेणी संदर्भात निर्णय घेताना तुम्ही केंद्राला विचारलं होतं का? आमच्या अस्मितेसंदर्भात कुठलाही विषय केंद्राकडे अडकणार नाही. आम्ही त्याच्या पाठीशी असू. परंतू, नाचता येईना अंगण वाकडं अशी त्यांची गत झालेली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवर आता प्रतिक्रिया द्यावी. काही झालं तरी चालेल, प्रसंगी सत्ता सोडू पण संभाजीनगर नामकरकण करू असं म्हणत होते, आता आहे का हिंमत? आता त्यांना सत्ता जास्त महत्वाची आहे. त्यामुळे केंद्राकडे बोट दाखवून जनतेचं फारकाळ लक्ष विचलीत करता येणार नाही.” असं शिवसेना उद्देशून दरेकर म्हणाले.