उच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार

0
681

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मुंबई उच्च न्यायालयाने  मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात २०१४ मध्ये दाखल मुख्य याचिकांसोबत या याचिकेवरही येत्या १० डिसेंबरला पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर आ याचिकेवर सुनावणी होणार आहे. या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात  याचिका दाखल करणाऱ्या जयश्री पाटील यांचे वकील अनुपस्थित राहिल्याने मराठा आरक्षणावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर आज (बुधवार)  दुपारी ३ वाजेपर्यंत वकिलासह याचिका सादर करण्याची परवानगी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिली होती.  त्यानुसार पुन्हा याचिका दाखल झाल्याने सुनावणी झाली.  त्यावेळी न्यायालयाने   स्थगिती देण्यास तूर्तास नकार दिला आहे.

दरम्यान, अॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण कायद्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. त्याचबरोबर एखाद्या समाजाला १६ टक्के आरक्षण देणे, हे संविधानाच्या तरतुदींविरोधात आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.  त्यामुळे आता न्यायालय यावर कोणता निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.