Desh

उघड्या गटाराला पोलिसाने दगडाने झाकलं, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

By PCB Author

July 12, 2019

बंगळुरु, दि, १२ (पीसीबी) – उघड्या गटारावर मोठा दगड ठेवून झाकणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बंगळुरु शहरातील हा फोटो असून कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पोलीस कॉन्स्टेबल उघड्या गटारावर दगड ठेवतो. एचएसआर लेआऊट पोलीस स्टेशनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर गिरीश एम यांचा हा फोटो शेअर केला आहे. उघड्या गटारामुळे किती मोठी दुर्घटना होऊ शकते याची प्रचिती मुंबईत आली आहे. गोरेगावमध्ये दोन वर्षांचा मुलगा गटारात पडून बेपत्ता झाला आहे.

रविवारी रात्री गिरीश एम गस्तीवर होते. यावेळी एचएसआर येथील तिसऱ्या सेक्टरमध्ये आपल्या गाडीवर असताना त्यांनी एक महिला आणि लहान मुलगा उघड्या गटाराच्या बाजूने गेल्याचे पाहिले. यावेळी त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांची वाट न पाहिली नाही आणि पुढे सरसावले. त्यांनी एक मोठा दगड आणला आणि त्या उघड्या गटारावर ठेवला.

७ जुलै रोजी करण्यात आलेले हे ट्विट अनेकांनी रिट्विट केले असून ४०० हून अधिक जणांनी लाईक केले आहे. अनेकांनी गिरीश यांचे कौतुक केले असून अजूनही काही चांगले लोक समाजात आहेत हे पाहून बरे वाटते अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान काही जणांनी महापालिकेवर टीका केली असून आपली जबाबदारी योग्य न पाडल्याप्रकरणी सुनावले आहे.