ई-सिगारेटच्या उत्पादन, विक्रीवर बंदी; केंद्र सरकारचा निर्णय

0
514

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – केंद्र सरकारने ई-सिगारेटचे उत्पादन, विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली. धुम्रपानाची समस्या सोडवण्यात ई-सिगारेट अपयशी ठरले आहे. शाळकरी मुलांमध्ये त्याचे फॅड वाढले आहे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने ई-सिगारेटवर बंदी घालण्यास मंजुरी दिली आहे. ई-सिगारेटचे निर्मिती-उत्पादन, आयात-निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरातीवर बंदी घातली आहे, असेही सीतारमण यांनी सांगितले.

ई-हुक्क्यावरही सरकारने बंदी घातली आहे. पहिल्यांदा गुन्हा केल्यास आरोपीला एका वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र, दुसऱ्यांदा केलेल्या गुन्ह्यात आरोपीला पकडले, तर पाच लाख रुपयांपर्यंत दंड किंवा तीन वर्षे तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.