‘ई-वाहन’ उद्योगातून मिळणार एक कोटी रोजगार

0
422

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – पारंपरिक इंधनाला पर्याय आणि पर्यावरणपूरक असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे ब्लू प्रिंट तयार करण्यात आली असून, त्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन’द्वारे एक कोटी नवे रोजगार निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

‘इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन’साठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनक्षेत्रातील तज्ज्ञांची फौज नेमण्यात येणार आहे. या माध्यमातून डिझाइन, टेस्टिंग, बॅटरीनिर्मितीसह व्यवस्थापन, विक्री, सेवा आणि पायाभूत सोयीसुविधा आदी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल, असा दावा करण्यात आला आहे. या शिवाय ऑटोमोटिव्ह मिशन प्लॅन २०२६ अंतर्गत देशातील वाहन उद्योगात अतिरिक्त साडेसहा कोटी नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कौशल्य विकास आणि उद्योग मंत्रालयातर्फे इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला आवश्यक मनुष्यबळाची योजना तयार करण्यात येत आहे. मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एका अभ्यासक्रमाचीही निर्मिती करण्यात येत आहे. केंद्र सरकारने २०१३मध्ये ‘इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन’ सादर केला होता. या माध्यमातून २०२०पर्यंत ६० लाख ते ७० लाख इलेक्ट्रिक वाहने रस्त्यांवर आणण्याचे आणि २०३० पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या एकूण वाहनांच्या तुलनेत ३० टक्क्यांवर पोहोचविण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते.