ईव्हीएम नाही तर हिंदूंच्या मेंदूत फेरफार – असदुद्दीन ओवैसी

0
745

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या दमदार विजयावर एमआयआमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली असून, भाजपाने हिंदूंच्या मेंदूत फेरफार केल्याचे म्हटले आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, ‘ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आलेला नाही, तर हिंदूंच्या मेंदूत फेरफार करण्यात आला’.

असदुद्दीन ओवैसी यांनी विरोधी पक्षांच्या एकता आणि धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधी पक्ष राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपाचा सामना करु शकले नाही अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. ओवैसी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना सल्ला देताना म्हटले आहे की, ‘भाजपाचा सामना करण्यासाठी आता नव्याने धोरणे आखण्याची गरज आहे’.

असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक जिंकत हैदराबादमधून विजय नोंदवला आहे. ‘राष्ट्रवादावर भाजपाचा सामना करु न शकल्याने विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे. विरोधकांना आता नव्याने धोरणे आखण्याची गरज आहे. याशिवाय भाजपाकडे जे निवडणूक तंत्र आहे, त्याने भाजपाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे’.