Maharashtra

ईव्हीएमची पूजा करणे श्रीपाद छिंदमच्या भावाला भोवली; गुन्हा दाखल

By PCB Author

December 10, 2018

अहमदनगर, दि. १० (पीसीबी) – वादग्रस्त श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदमने  मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएमची पूजा केली होती. या प्रकरणी श्रीकांत छिंदमसह आणखी ८ जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात  घेतले आहे.

श्रीकांत छिंदमने रविवारी अहमदनगर महापालिकेच्या मतदानादरम्यान ईव्हीएमची विधीवत पूजा केली होती. वादग्रस्त श्रीपाद छिंदम हा वॉर्ड क्रमांक ९ मध्ये अपक्ष उमेदवार आहे. मात्र, त्याला तडीपार करण्यात आले आहे. याच वॉर्ड क्रमांक ९ मध्ये असलेल्या मतदान केंद्रात श्रीपादचा भाऊ श्रीकांतने पूजा केली होती. यामुळे अहमदनगरमध्ये हा चर्चेचा विषय ठरला होता.

दरम्यान, अहमदनगर महापालिकेच्या १७ प्रभागातील ६८ जागांसाठी ही निवडणूक रविवारी झाली. या निवडणुकीसाठी ३५१ उमेदवार मैदानात होते. आज (सोमवार) महापालिका निवडणुकीचा निकाल लागणार आहे. छिंदम यांचा पराभव होणार की विजय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.